कृष्ण बाप्पानं केली गोवर्धनाची छत्री!
१. तेव्हा आपली पूजा बंद केलेली कळल्यावर नंद इ. गोपांवर इंद्र रागावला. कृष्ण या सर्वांचा नेता होता.
२. विद्वंसक मेघांच्या संवर्तक नावाच्या गणाला इंद्राने प्रेरणा दिली. स्वतःला सर्वांचा स्वामी समजणारा इंद्र संतापून त्या ढगांना म्हणाला.
३. हे जंगलात राहणारे गोप! यांना संपत्तीचा मोठा गर्व झालाय. मर्त्य कृष्णाच्या नाडी लागून ते देवांचा अपमान करीत आहेत.
४. हे म्हणजे फुटक्या नावांसारख्या असणाऱ्या केवळ कर्मरूप अशा यज्ञांच्या द्वारा भवसागर पार करण्याची इच्छा धरतात, आणि ब्रह्मविद्येला मात्र सोडून देतात.
५. त्या बडबड्या, पोरकट, गर्विष्ठ, अडाणी स्वतःला विद्वान समजणाऱ्या मर्त्य कृष्णाचा आश्रय घेऊन त्यांनी मला मात्र दुखवलंय!
६. संपत्तीचा माज असलेल्या, कृष्णाने भडकावलेल्या या गोपांचा संपत्तीचा माज पार धुवून काढा. त्यांच्या पशूंचा नाश करा.
७. ऐरावतावर बसून महाबलाढ्य अशा वासुजनांबरोबर मी तुमच्या मागे गोकुळात येईन. नंदाचे गोकूळ पार उद्ध्वस्त करायचंय मला.
श्री शुक म्हणाले -
८. अशी आज्ञा इंद्राने केली आणि ढगांची सगळी बंधने सोडून दिली आणि मोठमोठ्या धारांनी मोठ्या ताकदीने त्यांनी गोकुळाला झोडपायला सुरुवात केली.
९. विजांमुळे चमकणारे, मोठा गडगडाट करणारे आणि जोरदार वाऱ्याने ढकलल्या जाणाऱ्या ढगांनी गारांचा पाऊस पाडायला सुरुवात केली.
१०. मुसळासारख्या जाडजूड ढग सतत बरसू लागले. पाण्याचे एवढे मोठे लोटच्या लोट जमिनीवरून वाहू लागले की तिचा उंचसखलपणाच दिसेनासा झाला.
११. मुसळधार पाऊस, आणि प्रचंड सोसाट्याचा वारा यामुळे थंडीने पशू कुडकुडायला लागले. गारठ्याने हैराण झालेले गोप आणि गोपी मग गोविंदाला शरण गेले.
१२. मुसळधार पावसाने गांजलेले ते सगळे आपले मस्तक आणि पोरंबाळं यांना आपल्या अंगाखाली झाकून थंडीने कुडकुडत भगवंताच्या चरणावर गेले.
१३. कृष्णा! कृष्णा! अरे महाभाग! प्रभो! तूच या गोकुळाचा स्वामी आहेस! भक्तवत्सला! रागावलेल्या देवापासून आम्हास वाचव.
१४. मोठमोठ्या गारांच्या माऱ्याने झोडपलेल्या आणि निश्चेष्ट झालेल्या त्या सर्वांना पाहून भगवंतांच्या लक्षात आले, हा उद्योग संतापलेल्या इंद्राचाच!
१५. पावसाळा नसतानाही पडणारा धो धो पाऊस आणि गार, प्रचंड मोठा सोसाट्याचा वारा हे सर्व आमच्या नाशासाठी इंद्र करतो आहे, त्याचा यज्ञ आम्ही होऊ दिला आंही ना म्हणून!
१६. मी माझ्या योगमायेने याचा नीट प्रतिकार करीन. काळात नसल्यामुळे स्वतःला त्रैलोक्याचे स्वामी मानणाऱ्याचा संपत्तीचा गर्व आणि अज्ञानाचा अंधार दूर करेन.
१७. सद्गुणसंपन्न देवांना स्वामित्वाचा गर्व होणे योग्य नाही. या असत देवांचा माझ्याकडून जर मानभंग झाला, तर त्याचा परिणाम शांतीच असेल.
१८. हे गोकुळ मला शरण आले आहे, मी यांचा रक्षणकर्ता आहे, मी हे स्वीकारलेले आहे. म्हणून माझ्या मायेने याचे रक्षण करीन. हे मी घेतलेले व्रत आहे.
१९. असे म्हणून, कृष्णाने एका हाताने गोवर्धन पर्वत अगदी सहज उंच धरला, एखाद्या बालकाने जशी छत्री धारावी तसा.
२०. मग भगवान गोपांना म्हणाले, "आई, बाबा आणि सगळे गोकुळवासी जन हो! आपापली गुरे घेऊन तुम्ही सगळे या डोंगराखाली खुशाल 'शिरून बसा'
२१. माझ्या हातून पर्वत पडतोय की काय म्हणून तुम्ही काही घाबरू नका. सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस यांपासून तुमच्या रक्षणाची व्यवस्था केली आहे.
२२. कृष्णाने अशा प्रकारे त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आणि मग हळू हळू ते सगळे आपला पैसे अडका, गाई गुरे, सगळे पारिवारिक जण यांच्यासह गोवर्धनाच्या खाली शिरले.
२३. तहानभुकेची वेदना, सुखाची अपेक्षा सगळं काही विसरून ते गोकुळवासी कृष्णाकडे बघत राहिले. सात दिवस त्याने डोंगर धरून ठेवला होता, एक पाऊलही न हलवता.
२४. कृष्णाच्या योगमायेचा तो प्रभाव ऐकून इंद्र अतिशय आश्चर्यचकित झाला. त्याचा गर्व नष्ट झाला. त्याची ती प्रतिज्ञाही मोडली आणि आपल्या मेघांना त्याने आवरून घेतले.
२५. आकाश निरभ्र झाले, सूर्य दिसू लागला, वादळी वारा व मुसळधार पाऊस थांबला हे पाहून गोवर्धनधारी कृष्ण गोपांना म्हणाला,
२६. "गोपांनो! आता भीती सोडा, आपल्या स्त्रिया, मुलं बाळं, गोधन यासक्त आता बाहेर पडा. घनघोर पाऊस व झंझावात आता थांबला आहे. नद्यांचे पूरही ओसरले आहेत.
२७. मग ते सगळे गोप आपापले गोधन, स्त्रिया, लहान मुले, वृद्ध माणसे, सामानाने भरलेले छकडे असं सगळं घेऊन बाहेर पडले.
२८. मग सर्व सत्ताधारी भगवंताने सुद्धा तो पर्वत त्याच्या जागेवर पूर्वी जसा होता तसाच अगदी सहजपणे ठेवला, तेव्हा सगळे गोपजन त्याकडे बघत होते.
२९. तेव्हा प्रेमामुळे त्या गोपांना भरून आले. ते धावत त्याच्या पाशी गेले, त्यांनी कृष्णाला आलिंगन दिले. गोपींनी त्याची अतिशय प्रेमाने पूजा केली आणि दही, अक्षता आणि पाण्याने मोठ्या आनंदाने त्याचा मंगलविधी केला व त्याला आशीर्वाद दिला.
३०. यशोदा, रोहिणी, नंद, बाळाराम सगळ्यांच्या मनात कृष्णा बद्दल प्रेम दाटून आले आणि त्यांनी कृष्णाला मिठी मारली व आशीर्वाद दिला.
३१.राजा परीक्षिता! स्वर्गात देवगण, सिद्ध, साध्य, गंधर्व, चारण सगळे आनंदित झाले आणि अत्यानंदाने त्यांनी पुष्पवृष्टी केली.
३२. परीक्षिता आणि स्वर्गात देवांनी शंख, दुन्दुभी वाजवल्या, गंधर्वराज तुंबुरू गायन करू लागले.
३३. परीक्षिता! मग त्याच्यावर प्रेम करणारे ते त्याच्या भोवतीने चालू लागले. बलरामासह हरी मग आपल्या व्रजाकडे निघाला. हृदयाला स्पर्श करणारी अशी त्या हरीची अशी कृत्ये गात गात आनंदित गोपी आपल्या ववराजाकडे निघाला.
श्रीमद्भागवताच्या दशमस्कंधाच्या पूर्वार्धातील पंचविसावा अध्याय येथे संपला.
अथ पञ्चविंशोऽध्यायः
गोवर्धनधारण
श्रीशुक उवाच
इन्द्रस्तदाऽऽत्मनः पूजां विज्ञाय विहतां नृप ।
गोपेभ्यः कृष्णनाथेभ्यो नन्दादिभ्यश्चुकोप सः ।।१।।
गणं सांवर्तकं नाम मेघानां चान्तकारिणाम् । इन्द्रः प्राचोदयत् क्रुद्धो वाक्यं चाहेशमान्युत ।।२।।
अहो श्रीमदमाहात्म्यं गोपानां काननौकसाम् । कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य ये चक्रुर्देवहेलनम् ।।३।।
यथादृढैः कर्ममयैः क्रतुभिर्नाम नौनिभैः । विद्यामान्वीक्षिकीं हित्वा तितीर्षन्ति भवार्णवम् ।।४।।
वाचालं बालिशं स्तब्धमज्ञं पण्डितमानिनम् । कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य गोपा मे चक्रुरप्रियम् ।।५।।
एषां श्रियावलिप्तानां कृष्णेनाध्मायितात्मनाम् । धुनुत श्रीमदस्तम्भं पशून् नयत संक्षयम् ।।६।।
अहं चैरावतं नागमारुह्यानुव्रजे व्रजम् । मरुद्गणैर्महावीर्यैर्नन्दगोष्ठजिघांसया ।।७।।
श्रीशुक उवाच
इत्थं मघवताऽऽज्ञप्ता मेघा निर्मुक्तबन्धनाः । नन्दगोकुलमासारैः पीडयामासुरोजसा ।।८।।
विद्योतमाना विद्युद्धिः स्तनन्तः स्तनयित्नुभिः । तीव्रैर्मरुद्गणैर्नुन्ना ववृषुर्जलशर्कराः ।।९।।
स्थूणास्थूला वर्षधारा मुञ्चत्स्वभ्रेष्वभीक्ष्णशः । जलौघैः प्लाव्यमाना भूर्नादृश्यत नतोन्नतम् ।।१०।।
अत्यासारातिवातेन पशवो जातवेपनाः । गोपा गोप्यश्च शीतार्ता गोविन्दं शरणं ययुः ।।११।।
शिरः सुतांश्च कायेन प्रच्छाद्यासारपीडिताः । वेपमाना भगवतः पादमूलमुपाययुः ।।१२||
कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो । त्रातुमर्हसि देवान्नः कुपिताद् भक्तवत्सल ।।१३||
शिलावर्षनिपातेन हन्यमानमचेतनम् । निरीक्ष्य भगवान् मेने कुपितेन्द्रकृतं हरिः ।।१४||
अपर्त्त्वत्युल्बणं वर्षमतिवातं शिलामयम् । स्वयागे विहतेऽस्माभिरिन्द्रो नाशाय वर्षति ।।१५||
तत्र प्रतिविधिं सम्यगात्मयोगेन साधये । लोकेशमानिनां मौढ्याद्धरिष्ये श्रीमदं तमः ।।१६||
न हि सद्भावयुक्तानां सुराणामीशविस्मयः । मत्तोऽसतां मानभंगः प्रशमायोपकल्पते ।।१७||
तस्मान्मच्छरणं गोष्ठं मन्नाथं मत्परिग्रहम् । गोपाये स्वात्मयोगेन सोऽयं मे व्रत आहितः ।।१८||
इत्युक्त्वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम् । दधार लीलया कृष्णश्छत्राकमिव बालकः ।।१९||
अथाह भगवान् गोपान् हेऽम्ब तात व्रजौकसः । यथोपजोषं विशत गिरिगर्तं सगोधनाः ।।२०||
न त्रास इह वः कार्यो मद्धस्ताद्रिनिपातने । वातवर्षभयेनालं तत्त्राणं विहितं हि वः ।।२१||
तथा निर्विविशुर्गर्तं कृष्णाश्वासितमानसाः । यथावकाशं सधनाः सव्रजाः सोपजीविनः ॥२२||
क्षुत्तृड्व्यथां सुखापेक्षां हित्वा तैर्व्रजवासिभिः । वीक्ष्यमाणो दधावद्रिं सप्ताहं नाचलत् पदात् ।।२३||
कृष्णयोगानुभावं तं निशाम्येन्द्रोऽतिविस्मितः । निःस्तम्भो भ्रष्टसंकल्पः स्वान् मेघान् संन्यवारयत् ।।२४||
खं व्यभ्रमुदितादित्यं वातवर्षं च दारुणम् । निशाम्योपरतं गोपान् गोवर्धनधरोऽब्रवीत् ।।२५||
निर्यात त्यजत त्रासं गोपाः सस्त्रीधनार्भकाः । उपारतं वातवर्षं व्युदप्रायाश्च निम्नगाः ।।२६||
ततस्ते निर्ययुर्गोपाः स्वं स्वमादाय गोधनम् । शकटोढोपकरणं स्त्रीबालस्थविराः शनैः ।।२७||
भगवानपि तं शैलं स्वस्थाने पूर्ववत् प्रभुः । पश्यतां सर्वभूतानां स्थापयामास लीलया ।।२८||
तं प्रेमवेगान्निभृता व्रजौकसो यथा समीयुः परिरम्भणादिभिः ।
गोप्यश्च सस्नेहमपूजयन् मुदा दध्यक्षताद्भिर्युयुजुः सदाशिषः ।।२९||
यशोदा रोहिणी नन्दो रामश्च बलिनां वरः । कृष्णमालिङ्ग्य युयुजुराशिषः स्नेहकातराः ।।३०||
दिवि देवगणाः साध्याः सिद्धगन्धर्वचारणाः । तुष्टुवुर्मुमुचुस्तुष्टाः पुष्पवर्षाणि पार्थिव ।।३१||
शंखदुन्दुभयो नेदुर्दिवि देवप्रणोदिताः । जगुर्गन्धर्वपतयस्तुम्बुरुप्रमुखा नृप ।।३२||
ततोऽनुरक्तैः पशुपैः परिश्रितो राजन् स गोष्ठं सबलोऽव्रजद्धरिः ।
तथाविधान्यस्य कृतानि गोपिका गायन्त्य ईयुर्मुदिता हृदिस्पृशः ।।३३||
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे पञ्चविंशोऽध्यायः ।।२५।।
/