कृष्ण बाप्पानं खेचलं भलं मोठं उखळ!

कृष्णानं खेचलं भलं मोठं उखळ!

श्रीमद्भागवतातील दशमस्कंध पूर्वार्धातील नवव्या अध्यायातील ही गोष्ट आहे.

१. घरात काम करणाऱ्या मदतनीस बायकांवर अन्य काम सोपवल्यामुळे नंदपत्नी यशोदा स्वतःच दही घुसळायला बसली.
२. दही घुसळता घुसळता ती बाळकृष्णाची अनेक गाणी, त्याच्या खोड्या, त्याच्या लीला आठवून आठवून गात होती.
३. त्या सुंदरीने रेशमी वस्त्र धारण केले होते. स्थूल कमरेला मेखला बांधली होती. बाळावरच्या वात्सल्यामुळे तिच्या स्तनांतून दूध पाझरत होते. अंगाला किंचित कंप सुटला होता. घुसळ दोरी ओढण्याच्या श्रमामुळे तिच्या हातातील कांकणे आणि कानातील कुंडले मागे पुढे होती. चेहरा घामेजला होता. केसात माळलेल्या मालतीची फुले गळून पडत होती; आणि अशी ती दही घुसळत होती.
४. ती अशी दही घुसळत होती आणि दूध पिण्याची इच्छा झालेला श्रीहरी लडिवाळपणे तिच्याजवळ गेला. रवी पकडून त्यानं ते घुसळणं थांबवलं.
५. त्याला मांडीवर घेऊन ती त्याला प्रेमानं पाझरणारं दूध पाजू लागली आणि त्याचा हसरा चेहरा न्याहाळत राहिली. पण चुलीवर ठेवलेलं दूध उतू जाऊ लागलंय असं बघितल्यावर त्याला तसंच भुकेलं सोडून ती वेगानं तिकडं धावली.
६. रागावलेला कृष्ण रागानं थरथरणारा आपला ओठ दातांनी चावू लागला आणि दह्याचं ते मडकं त्यानं दगडानं फोडून टाकलं. डोळ्यांत खोटे अश्रू आणून आत जाऊन तो गुपचूप लोणी खात बसला.
७. तापलेलं दूध खाली उतरवून यशोदा आत आली. भांड्यातलं दही खाली सांडलेलं, आणि दह्याचा डेरा फुटल्याचं तिनं पाहिलं. आपल्या मुलाचाच हा उद्योग तिनं जाणलं. पण तो मात्र तिथं कुठंही दिसला नाही.
८. उखळाच्या तोंडावर उभा असलेल्या, शिंक्यात ठेवलेलं दही खुशाल मर्कटांना यथेच्छ देत असलेल्या आपल्या मुलाला तिनं पाहिलं. आपली चोरी कुणी बघत तर नाही ना म्हणून त्याचे डोळे कावरे बावरे झाले होते. त्याला पाहून यशोदा हळूच मुलाच्या पाठीमागे आली.
९. हातात छडी घेऊन तिला येताना पाहून ताबडतोब तो खाली उतरला आणि भ्यायल्यासारखा पळाला, त्याच्यामागे यशोदा पळू लागली.
१०. अशा प्रकारे त्याच्या पाठीमागे धावल्याने, स्थूल आणि पळत असणाऱ्या नितंबांमुळे तिची गती मंदावली. तिची कंबर नाजूक होती. वेगामुळे केस मोकळे झाले. गाळून पडायला लागली आणि तिनं त्याला पकडलं.
११. हातून चूक झाल्यामुळं रडणाऱ्या, आपल्या हातानं डोळे चोळणाऱ्या, त्याच्या डोळ्यातलं काजल बाहेर आलं होतं. घाबरून बघणाऱ्या त्याचा हात पकडून ती त्याला रागावू लागली.
१२. लेकरू घाबरलंय असं पाहून तिच्या मनात एक्दम प्रेम दाटून आलं, तिनं छडी टाकून दिली आणि ती त्याला दोरीनं बांधण्यासाठी गेली. त्याच्या सामर्थ्याची तिला कल्पना नव्हती.
१३. & १४. ज्याच्या आत नाही, ज्याच्या बाहेर नाही, ज्याच्या आधी नाही, ज्याच्या नंतर काही नाही, जो या विश्वाच्या आत बाहेर, अलीकडे आणि पलीकडे आहे, जो स्वतःच विश्व आहे, त्या अव्यक्ताला मानव रूपातला आपला मुलगा ती मानत होती. एखाद्या सामान्य मुलाला बांधावं तसं यशोदेनं त्याला उखळाला बांधलं.
१५. खोड्या करणाऱ्या आपल्या मुलाला ती जेव्हा बांधायला गेली, तेव्हा ती दोरी दोन बोटं कमीच पडली. मग तिनं आणखी एक दोरी त्या दोरीला जोडली.
१६. ती पण दोरी जेव्हा कमी पडली तेव्हा तिने आणखी एक जोडली. ती सुद्धा दोन बोटं कमी पडली. अशा रीतीनं ती जो जो दोरी आणत गेली, तो तो ती दोन बोटं कमीच पडत गेली.
१७. अशा रीतीनं आपल्या घरातून दोऱ्या आणून ती जोडत गेली. हे पाहून गोपी हसू लागल्या आणि यशोदेलाही हसू आलं आणि आश्चर्य वाटलं.
१८. आपली आई घामाघूम झाली आहे. धावपळीमुळं तिच्या केसातला फुलं गाळून पडली आहेत, हे तिचे श्रम पाहून कृष्णाला तिची दया अली आणि त्यानं स्वतःला बांधून घेतलं.
१९. अरे राजा, हे सगळं विश्व ज्याच्या अधीन आहे, आणि जो स्वतःच स्वतंत्र आहे, त्या कृष्णानं आपण भक्तांच्या अधीन आहोत असं दाखवून दिलं.
२०. ब्रह्मदेव, शिव एवढंच नाही तर त्याच्या अगदी जवळ असणारी लक्ष्मी यांनाही जी कृपा मिळाली नाही, ती मुक्ती देणाऱ्या त्याच्याकडून यशोदेला मिळाली.
२१. भगवत्स्वरूप असा हा यशोदेचा मुलगा, देशाभिमानी, तसंच आत्मस्वरूप झालेले ज्ञानी यांनाही सुलभ नाही, पण तो त्याच्या भक्तांना मात्र फार सुलभ आहे.
२२. आई घरकामात गुंतली असताना कृष्णानं दोन अर्जुनवृक्ष पहिले, जे अगोदर कुबेराचे पुत्र होते.
२३. नलकूबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावं होती. खूप वैभव असल्याचा त्यांना गर्व झाला होता, त्यामुळं नारदांनी त्यांना शाप दिला होता व ते वृक्षरूप झाले होते.
श्रीमद्भागवतपुराणाच्या दशमस्कंधाच्या पूर्वार्धातील नववा अध्याय इथे संपला.


दहावा अध्याय
२४. भगवंताचा श्रेष्ठ भक्त असलेल्या नारदऋषींची शापवाणी खरी करण्यासाठी श्री हरी हळूहळू त्या दोन अर्जुनवृक्षांकडे जाऊ लागले.
२५. कृष्णानं विचार केला, देवर्षी नारद माझे अतिशय प्रिय आहेत आणि हि तर कुबेराची मुलं आहेत. तर मला आता असं काही काम केलं पाहिजे जे त्या थोर भागवद्भक्तानं उच्चारलं होतं.
२६. असं म्हणून दोन्ही अर्जुनवृक्षांच्या मधून कृष्ण गेला. तो स्वतः त्यात घुसून पुढं गेला पण उखळ मात्र तिरकं झालं.
२७. बाळ दामोदरानं आपल्या मागचं उखळ खेचलं आणि त्या झाडांची मुळंच उखडून आली. प्रचंड आवाज करीत ती झाडं खाली पडली. अत्यंत विक्रमी अशा कृष्णाच्या धक्क्यानं त्या झाडांचे बुंधे, फांद्या, पानं यांचा थरकाप उडाला होता.
२८. आपल्या महान तेजानं दिशांना प्रकाशित करणारे दोन सिद्ध पुरुष त्या झाडांमधून प्रकट झाले. अखिल विश्वाचा स्वामी असणाऱ्या कृष्णाला त्यांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला. ते अत्यंत शुद्ध होते. हात जोडून ते कृष्णाची स्तुती करू लागले.

/


Older Post Newer Post


Translation missing: hi.general.search.loading