सगळ्यांत आधी गणपती बाप्पाची पूजा का करतात?

गणपती बाप्पाची पूजा सगळ्यांत आधी का करतात?

आमच्या पुस्तकातल्या गोष्टी या शिशूंना लक्षात घेऊन संक्षिप्त स्वरूपात लिहिलेल्या आहेत. यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक, नकारात्मक गोष्टींचा उल्लेख टाळला आहे किंवा गोष्टीची गरज असल्यास नावापुरता केला आहे. पण पालकांना उत्सुकता नक्कीच असेल की ही मूळ गोष्ट कशी आहे व कुठल्या ग्रंथातली आहे, आणि म्हणूनच आपण या पानावर आला आहात. इथे आम्ही ही गोष्ट कोणत्या ग्रंथातली आहे, तिचे मूळ संस्कृत रूप आणि त्याचा अनुवाद दिलेला आहे. पालकांनी ती पूर्ण वाचावी, आपल्या बाळाची समज, त्याला काय सांगायचे आणि शिकवायचे याबद्दल आपले विचार लक्षात घेऊन घेऊन, गोष्ट वाचून दाखवताना त्यात तपशील घालावे. पुस्तकातली गोष्ट ही आधार असून, पालकांनी ती आपल्या भाषेत रंगवून आपल्या बाळाला सांगावी. या पद्धतीने हे पुस्तक खूप वर्ष तुमच्या शिशूंची सोबत करेल.

 

१. अगदी तान्ह्या बाळांना फक्त रंग कळतील, वस्तू धरायची सवय होईल.

२. बाळ पालथं पडल्यावर आकर्षक रंग असलेली ही पुस्तके समोर ठेवल्यास बाळ ती बघत बसेल, घ्यायचा प्रयत्न करेल.

३. या सर्व टप्प्यांवर तुम्ही जर बाळाला गोष्टी वाचून दाखवत राहिलात तर ते तुमच्या आणि बाळाच्या दिनक्रमाचा एक सुंदर भाग बनू शकेल.

४. हळू हळू मुलं चित्र आणि गोष्टी यांचा संबंध जोडू लागतील. आणि जसे जसे तुम्ही गोष्ट वाचाल, तशी तशी पानं उलटू लागतील.

५. आणि जेव्हा ही मुलं वाचायला लागतील, तेव्हा अत्यंत सोप्प्या भाषेतील या गोष्टी त्यांचे पहिले वाचन साहित्य होईल.

 

आता वळूया आपल्या मूळ संस्कृतमधील गोष्ट आणि तिच्या अनुवादाकडे.

ही गोष्ट पद्मपुराणाच्या सृष्टिखंडातील ६२व्या अध्यायात सांगितली आहे.

 

 


अनुवाद

पुलस्त्य ऋषी म्हणाले -

एवढ्यात व्यासांचा शिष्य थोर मुनी संजयाने गुरु भीष्मांना नमस्कार करून त्यांना विचारले ।।१।।

संजय म्हणाला -

देवांच्या पूजनाचा निश्चित क्रम सांगावा. सर्वप्रथम कोणाची पूजा करावी? विधीच्या मध्ये कोणाची? ।।२।। शेवटी कोणाची? कोणाला कोण प्रभावी असेल? हे ब्रह्मन् कुणाची पूजा केल्यावर कोणते फळ मिळेल? ।।३।।

व्यास म्हणाले -

या लोकीची किंवा परलोकीची विघ्ने नष्ट व्हावीत म्हणून प्रथम गणेशाची पूजा करावी, जसे पार्वतीपुत्र, विनायक (प्राणिमात्रांचा स्वामी) झाला तसाच तो हि (गणेशाची प्रथम पूजा करणाराही) विनायक होतो. ।।४।। पार्वती-महेश्वरांना दोघे मुलगे झाले. ते म्हणजे सर्व लोकांना आधार देणारे, शूर असे स्कंद आणि गणेश हे देव होय. ।।५।। त्यांना पाहताच देवांनी अत्यंत श्रद्धेने अमृतापासून केलेला, अत्यंत आनंद देणारा असा एक दिव्य मोदक तिला दिला ।।६।। तो मोदक पाहून दोघांनीही आपल्या आईकडे तो मागितला. तेव्हा आश्चर्यचकित झालेली पार्वती त्या दोघांना म्हणाली, ।।७।। "मुलांनो, आनंदित झालेल्या देवांनी हा मोदक दिला आहे. तो अमृतापासून तयार केला असून महाबुद्धी म्हणून तो प्रसिद्ध आहे. ।।८।। याचे महत्त्व तुम्हाला सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. हा फक्त हुंगला तरी त्यामुळे अमरत्व निश्चित मिळेल. ।।९।। मुलांनो तुमच्यापैकी जो सर्व शास्त्रांचे मर्म जाणणारा, सर्व शस्त्रे व अस्त्रे यात निष्णात, सर्व तंत्रांमधे निपुण, लेखक, विलक्षण गोष्टी करणारा, बुद्धिमान ।।१०।। ज्ञान व विज्ञान जाणणारा, सर्वज्ञ असा असेल, तसेच धर्मापेक्षासुद्धा त्याला काही अधिक गोष्टी लाभलेल्या असतील व शेकडो सिध्दीही मिळालेल्या असतील, त्यालाच हा मोदक देईन. तुमच्या वडिलांनाही असेच वाटते." ।।११।।

व्यास म्हणाले,

आईच्या मुखातून असे शब्द ऐकल्याबरोबर अत्यंत हुशार असा स्कंद ताबडतोब आपल्या मोरावर बसून, त्रिभुवनातल्या गुरूंकडे गेला. बुद्धिमान लंबोदराने मात्र क्षणभरात स्नान केले आणि आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली, ।।१३।। मग तो लंबोदर आनंदाने आईवडिलांच्या पुढ्यात उभा राहिला. तसेच स्कंद सुद्धा मला दे म्हणून पुढे उभा राहिला. तेव्हा मुलांना पाहून आश्चर्यचकित झालेली पार्वती म्हणाली, ।।१४।।

 

पार्वती म्हणाली,

सर्व तीर्थांमध्ये केलेली स्नाने, सर्व देवांना केलेले नमस्कार, सर्व यज्ञ, व्रते, मंत्र, योगसाधना तसेच अन्य नेमनियम हे सर्व आईवडिलांना केलेल्या पूजेच्या सोळाव्या भागाच्याही तोडीचे नाहीत. म्हणून शंभर पुत्रांपेक्षा आणि शेकडो गणांपेक्षाही हा वरचढ आहे. ।।१६।। म्हणून देवांनी तयार केलेला हा मोदक मी हेरंबास देत आहे. याच कारणाने यज्ञ, वेदपाठ, शास्त्राध्ययन, स्तोत्रपाठ आणि नित्य पूजाविधीमधे सुरुवातीला याची, म्हणजे हेरंबाची, पूजा होईल. ।।१८।।

व्यास म्हणाले -

पार्वतीसह भगवान शंकरांनी पण त्याला मोठा वर दिला.

महादेव म्हणाले -

याच्या अग्रपूजनाने सर्व देव संतुष्ट होतील. तसेच गणेशाच्या नित्य अग्रपूजनाने सर्व देवी आणि पितर यांना आनंद होईल. ।।२०।।

/


Older Post Newer Post


Translation missing: mr.general.search.loading