गणपती बाप्पाला दूर्वा का आवडतात?

गणपती बाप्पाला दूर्वा का आवडतात?

आमच्या पुस्तकातल्या गोष्टी या शिशूंना लक्षात घेऊन संक्षिप्त स्वरूपात लिहिलेल्या आहेत. यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक, नकारात्मक गोष्टींचा उल्लेख टाळला आहे किंवा गोष्टीची गरज असल्यास नावापुरता केला आहे. पण पालकांना उत्सुकता नक्कीच असेल की ही मूळ गोष्ट कशी आहे व कुठल्या ग्रंथातली आहे, आणि म्हणूनच आपण या पानावर आला आहात. इथे आम्ही ही गोष्ट कोणत्या ग्रंथातली आहे, तिचे मूळ संस्कृत रूप आणि त्याचा अनुवाद दिलेला आहे. पालकांनी ती पूर्ण वाचावी, आपल्या बाळाची समज, त्याला काय सांगायचे आणि शिकवायचे याबद्दल आपले विचार लक्षात घेऊन घेऊन, गोष्ट वाचून दाखवताना त्यात तपशील घालावे. पुस्तकातली गोष्ट ही आधार असून, पालकांनी ती आपल्या भाषेत रंगवून आपल्या बाळाला सांगावी. या पद्धतीने हे पुस्तक खूप वर्ष तुमच्या शिशूंची सोबत करेल.

 १. अगदी तान्ह्या बाळांना फक्त रंग कळतील, वस्तू धरायची सवय होईल.

२. बाळ पालथं पडल्यावर आकर्षक रंग असलेली ही पुस्तके समोर ठेवल्यास बाळ ती बघत बसेल, घ्यायचा प्रयत्न करेल.

३. या सर्व टप्प्यांवर तुम्ही जर बाळाला गोष्टी वाचून दाखवत राहिलात तर ते तुमच्या आणि बाळाच्या दिनक्रमाचा एक सुंदर भाग बनू शकेल.

४. हळू हळू मुलं चित्र आणि गोष्टी यांचा संबंध जोडू लागतील. आणि जसे जसे तुम्ही गोष्ट वाचाल, तशी तशी पानं उलटू लागतील.

५. आणि जेव्हा ही मुलं वाचायला लागतील, तेव्हा अत्यंत सोप्प्या भाषेतील या गोष्टी त्यांचे पहिले वाचन साहित्य होईल.

 आता वळूया आपल्या मूळ संस्कृतमधील गोष्ट आणि तिच्या अनुवादाकडे.

ही गोष्ट गणेश पुराणातील उपासना खंडातील ६३व्या आणि ६४व्या अध्यायात आहे.

अनुवाद

इंद्राला भेटण्यास उत्सुक झालेले नारद एकदा इंद्राकडे गेले. मोठ्या भक्तिभावाने त्यांचे पूजन झाले. आसनस्थ झाल्यावर त्या वल राक्षसाचा वध करणाऱ्या इंद्राने नारदांना मोठ्या आदराने दूर्वांचे माहात्म्य विचारले. इंद्र म्हणाला - ।।६।। हे मुने! देवाधिदेव अशा थोर गणेशाला विशेषतः दूर्वांकुर एवढे प्रिय का बरे? ।।७।।

नारदमुनी म्हणाले -

दूर्वा माहात्म्य फार उत्तम आहे. मला जसं माहिती आहे, तसं तुला सांगतो. स्थावर नगरात पूर्वी कौंडिन्य नावाचे एक थोर मुनी रहात होते. ।।८।। ते गणेशाचे उपासक होते. त्यांच्यापाशी तपश्चर्येचे सामर्थ्य होते. गावाच्या दक्षिणेकडे त्यांचा मोठा असा रमणीय आश्रम होता. वृक्षवेलींनी युक्त, फुललेली कमळे असणारी मोठमोठी सरोवरे त्यात होती. ।।९।। ।।१०।। त्यात भुंगे, हंस, कारंडक, चक्रवाक, बगळे, कासव, पाणकोंबडे होते. ।।११।। ते कौंडिन्य मात्र ध्यानमग्न असत आणि तीव्र तप करीत असत. चतुर्भुज गणेशाची मोठी मूर्ती समोर ठेवून देवाला संतुष्ट करणाऱ्या सहा अक्षरी श्रेष्ठ मंत्राचा जप करीत असत. ही मूर्ती अतिशय प्रसन्न होती, उत्तम वरदायिनी होती, दूर्वांनी तिची छान पूजा केलेली असे. ।।१२।। ।।१३।। आश्रया नावाच्या त्यांच्या पत्नीने एकदा मनात शंका येऊन विचारले.

आश्रया म्हणाली -

हे स्वामी! भगवान गणेशांवर दररोज तुम्ही भारंभार दूर्वा का वाहता? गवतामुळे कधी कुणी संतुष्ट होतं का? यानं काही पुण्य मिळत असेल तर मला ते कृपा करून सांगा! ।।१४।। ।।१५।। कौंडिन्य ऋषी म्हणाले -

प्रिये! ऐक! मी सर्वश्रेष्ठ असे दूर्वांचे माहात्म्य सांगतो. यमधर्माच्या नगरीत एकदा एक मोठा उत्सव होता. ।।१६।। सर्व देव, गंधर्व, अप्सरांचे गण, सिद्ध, चारण, नाग, मुनी, यक्ष आणि राक्षस सुद्धा त्यात बोलावले होते. ।।१७।। तिलोत्तमा नृत्य करीत असताना तिचं उत्तरीय खाली पडले. आणि तिचे सुंदर, मोठे स्तन त्या;  यमाला दिसले. ।।१८।। तो कामातुर झाला, थकला, त्याला लाज वाटेनाशी झाली; आणि तिला आलिंगन देण्यासाठी व तिच्या मुखाचे चुंबन घेण्यासाठी तो तिच्याकडे गेला. ।।१९।। म्हणून मग लाजेने मान खाली घालून यम त्या सभेतून बाहेर पडला. जाता जाता त्याचे वीर्य स्खलित झाले आणि जमिनीवर पडले. ।।२०।। वेडेवाकडे तोंड असलेला, ज्वालांच्या माळा घातलेला एक क्रूर पुरुष त्यातून प्रकट झाला. कराकरा दातांचा आवाज करीत, व त्रैलोक्याला घाबरवीत! ।।२१।। तो पृथ्वी जाळायला निघाला, आपल्या जटांनी तो गगनाला स्पर्श करीत होता. त्याच्या आवाजाने त्रैलोक्याचे मन चळाचळा कापू लागले. ।।२२।। तेव्हा सभेतील ते सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. वेगवेगळ्या प्रकारांनी स्तोत्रांनी जशी जमेल तशी त्यांची स्तुती करून एकाग्रपणे सर्व जगाच्या कल्याणासाठी त्यांनी त्यांना प्रार्थना केली. भगवान विष्णू त्या सर्वांना घेऊन तेजस्वी अशा गणेशांकडे गेले. ।।२३।। ।।२४।। त्यांच्या हातूनच त्या दैत्याचा नाश आहे असे जाणून त्या सर्वांनी त्यांची स्तुती केली.

देव आणि मुनी म्हणाले -

विघ्न नसणे हेच ज्याचे स्वरूप आहे, तसेच (भक्तांच्या) विघ्नांना दूर करणाऱ्या देवाला नमस्कार असो. ।।२५।। सर्वरूप असणाऱ्या, सर्वांचा साक्षी असणाऱ्या देवा तुला नमस्कार असो. थोर देवाला आणि विश्वाच्याही प्रारंभी असणाऱ्या देवाला नमस्कार असो. ।।२६।। हे कृपानिधे! तुला नमस्कार असो! विश्वाच्या पालनकर्त्याला नमस्कार असो, अंधारालाही भरून टाकणाऱ्या आणि सर्वांचा संहार करणाऱ्या देवा, तुला नमस्कार असो. ।।२७।।  हे भक्तांना वर देणाऱ्या देवा! सर्व देणाऱ्या तुला नमस्कार असो. तुझ्या शिवाय दुसरे कोणीही आमचे शरणस्थान नाही. तू सर्वांची कामनांची पूर्ती करणारा आहेस, तुला नमस्कार असो! ।।२८।। तू वेदांचा ज्ञात आहेस आणि वेदांचे कारणही आहेस. आम्ही दुसऱ्या कुणाला शरण जाऊ? आमचे भय दूर करणारा कोण असेल बरे! ।।२९।। लोकांवर हा अकाली प्रलय कसा गुदरला? हे देवाधिदेव गजानना! हे विघ्नहारका! हे अव्यया! काय हा भयंकर प्रसंग! ।।३०।। सर्वांचे मरण येऊन ठेपलंय. आमची उपेक्षा का बरं करतोस? हे त्यांचे बोलणे ऐकून, शत्रुभयाचा नाश करणारा असा करुणासागर गजानन लहान बाळाचे रूप घेऊन त्यांच्या पुढ्यात प्रकट झाला. त्याचे डोळे कमळासारखे होते आणि मुख शेकडो चंद्रासारखे सुंदर होते. ।।३१।। ।।३२।। कोटी सूर्यांच्या तेजाची प्रभावळ त्याच्या भोवती होती. कोटी मदनांना जिंकून घेईल असे त्याचे शरीर होते. कुं दा च्या कळ्यांच्याही सौंदर्याला हरवणारे त्याचे दात होते. बिंबफळालाही मागे टाकेल असा अधरोष्ठ होता. ।।३३।। नाक तरतरीत होते. डोळे व भुवया सुंदर होत्या.  मान शंखासारखी रेखीव होती. वक्षस्थळ विशाल होते. दोन्ही हात गुडघ्यापर्यंत लांब होते व तो सामर्थ्यवान होता. ।।३४।। त्याच्या पोटावरची नाभी खोल होती. त्याचा कटिभाग अतिशय सुंदर होता. त्याच्या मांड्या केळीच्या बुंध्याच्या सौंदर्याशी स्पर्धा करणाऱ्या होत्या, त्याचे गुडघे सुंदर होते. ।।३५।। त्याच्या जांघा, घोटे सुंदर असून, चरण कमळासारखे होते. अनेक अलंकारांच्या शोभेने तो बाळ सुंदर दिसत होता. त्याने भारी वस्त्र पांघरलेली होती. ।।३६।। अशा त्या देवाला, नगराच्या सीमेवरील जमिनीवर पाहून, देव आणि मुनी जयजयकार करीत उभे राहिले. ।।३७।।  इंद्राला देवगणांनी प्रणाम करावा तसा त्यांनी भूमीवर दंडवत प्रणाम केला.

देव आणि ऋषी म्हणाले - तुम्ही कोण आहात? कुठून आलात? हे प्रभो! आपले काय काम आहे सांगा! ।।३८।। आम्हाला असे माहित आहे की अनलासुराच्या भीतीने आपली कर्म सोडून दिलेल्या आम्हाला वाचविण्यासाठी साक्षात ब्रह्मच दुष्टांचा संहार करणारे बालरूप धारण करत प्रकट होणार आहे. हे त्यांचे बोलणे ऐकून शिशुरूपी गजानन हसत हसत सर्व देवांना आणि मुनींना म्हणाला.

बालक म्हणाला –

"तुम्ही ज्ञानसंपन्न आहात. तुम्ही जे म्हणालात ते खरंच आहे. ।।३९।। ।।४०।। ।।४१।। हे देवांनो! हे ऋषींनो! त्या दुसऱ्यांना छळणाऱ्या त्या दुष्टाच्या वधासाठीच मीच माझ्या मायेने बालरूप घेऊन वेगाने आलो. ।।४२।। हे निष्पाप देवांनो मी तुम्हाला त्याच्या वधासाठी उपाय सांगतो, तो तुम्ही करा. तुम्ही सर्वांनी त्याला पाहून मला मुद्दामच प्रोत्साहन द्यावे. ।।४३।। त्याचा आणि त्याच्यापेक्षा अधिक महान असा माझा पराक्रम पाहावा. हे कृपापूर्ण बोलणे ऐकून त्या सर्वांना फार आनंद झाला. ।।४४।। ते एकमेकांना म्हणू लागले, "याचा पराक्रम आम्हाला माहित नाही. ईश्वर बालरूप घेऊन या राक्षसाचा वध करण्यासाठी अवतीर्ण होणार आहे बरं! असं म्हणून त्यांनी आदरपूर्वक त्यास नमस्कार केला. ।।४५।। ।।४६।। एवढ्यात कालानलाचे रूप धारण केलेला तो दैत्य दशदिशांना जाळीत, नरलोकांचे भक्षण करीत तिथे येऊन पोहोचला. ।।४७।। आक्रोश करणाऱ्या लोकांचा फार मोठा कोलाहल झाला. हे सगळे पाहूनच सगळे मुनी पटकन दूर पळून गेले. ।।४८।। ते मुनी त्याला म्हणाले पटकन पळून जा, नाहीतर हा भला थोरला अनलासुर नक्कीच तुला ठार मारील, ज्याप्रमाणे तिमिंगल मासा छोट्या माशांना मारतो किंवा जसा गरुड सापांना मारतो त्याप्रमाणे! हे त्यांचे बोलणे ऐकून बालरूप घेतलेला परमात्मा गजानन हिमालय पर्वतासारखा दृढपणे तिथेच राहिला; आणि देव व ऋषी त्या बाळाला तिथेच टाकून लांब पळून गेले.

येथे गणेशपुराणाच्या उपासना खंडातील दूर्वामाहात्म्य नावाचा त्रेसष्ठावा अध्याय संपला. ।।४९।। ।।५०।। ।।५१।।

 

चौसष्ठावा अध्याय

देव आणि ऋषी पळून गेले आणि तिथे पर्वतासारखे स्थिर राहिले, तेव्हा ते बालक आणि तो अनलासुर यांच्यात काय विलक्षण घडले, हे थोरमुने! ते मला लवकर सविस्तर सांगा!

नारद म्हणाले -

" तिने केल्यावर ते श्रेष्ठ मुनी कौंडिन्य, ।।१।। ।।२।। जे म्हणाले ते मी आता तुला सांगतो, हे इंद्रा तू ते ऐक. कौंडिन्य म्हणाले, "बाळ गजानन एखाद्या पर्वतासारखा स्थिरपणे तिथे उभा राहिला असता. ।।३।।

(नारद इंद्राकडे गेले असता इंद्राने दूर्वामाहात्म्य विचारले. म्हणून नारद इंद्राला कौंडिन्य ऋषींची कथा सांगत आहेत).  

ज्याचा थरकाप करणे अशक्य आहे असा काळाग्नी सारखा तो महाभयंकर अनलासुर आला. त्याक्षणी पर्वतांची साथ असूनही पृथ्वी डळमळीत झाली. ।।४।। ढगांच्या गडगडाटासारख्य आवाजाने झाडांच्या फांद्यांवरचे पक्षी खाली जमिनीवर पडले. ।।५।। तेव्हा समुद्रातले पाणी आटून गेलं. झाडं उन्मळून पडली. प्रचंड मोठ्या थरकापामुळे काही कळेनासे झाले. ।।६।। त्याच क्षणी दिव्य बालरूप धारण केलेल्या गजाननाने आपल्या मायेच्या सामर्थ्याने अग्नीचे रूप धारण केलेल्या त्या दैत्याला पकडले. ।।७।। अगस्ती ऋषीने जसा समुद्र प्राशन केला, त्याप्रमाणे सर्वांच्या देखतच त्याने त्या अनलासुराला गिळंकृत केले. तेव्हा त्या देवाने विचार केला की हा जर पोटात गेला नाही तर तो त्रैलोक्याला जाळील. मग त्याच्या पोटात एक भयंकर विलक्षण घटना घडली. तेव्हा इंद्राने त्या अग्नीला शमविण्यासाठी चंद्र दिला. ।।८।। ।।९।। देव आणि मुनी त्याचे 'भालचंद्र' म्हणून कौतुक करू लागले. पण कंठमध्यातून खाली गेलेला अग्नी काही शांत झाला नाही. ।।१०।। नंतर ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी नावाच्या आपल्या मानसकन्या देऊ केल्या. केळीच्या खुंटासारख्या मांड्या असणाऱ्या, कमळासारखे डोळे असणाऱ्या, कमलनालासारखे केस असणाऱ्या, चंद्रासारखे मुख असणाऱ्या, अमृतासारखी वाणी असणाऱ्या, खोल नाभी असणाऱ्या, नदीसारख्या सरळ वळ्या असणाऱ्या, कमळाच्या देठासारखी नाजूक कंबर असणाऱ्या, प्रवाळासारखे हात असणाऱ्या, थंडावा देणाऱ्या अशा त्या कन्यका होत्या. ।।११।। ।।१२।। आणि ब्रह्मदेव म्हणाला, "यांना तू आलिंगन दे. तुझी आग थंडावेल." त्यांच्या आलिंगनाने आग किंचितच थंडावली. ।।१३।। विष्णूने गणेशाला कोवळे कमल दिले. त्यामुळे सर्व देव आणि मनुष्य त्याला पद्मपाणि म्हणू लागले. ।।१४।। (तरीही पोटातली) आग शांत न झाल्यामुळे वरुणाने थंडगार पाण्याचा वर्षाव केला. मग शिवाने हजार फण्या असलेला नाग दिला. ।।१५।। तो पोटावर बांधला त्यामुळे तो व्यालबद्धोदर झाला. तरीपण आग आग होत असलेला गळा काही थंड झाला नाही. ।।१६।। मग ऐंशी हजार ऋषी मुनी गणेशाकडे आले. प्रत्येकाने एकवीस दूर्वा त्याच्या मस्तकावर वाहिल्या. या दूर्वा अमृतासारख्या होत्या. मग ती आग शांत झाली आणि तो परमात्मा दूर्वांकुरांनी पूजिल्यामुळे संतुष्ट झाला. ।।१७।। ।।१८।। हे जाणून त्या सर्वांनी अनेक दूर्वांकुरांनी त्या गजाननाची पूजा केली. त्यामुळे गजानन आनंदित झाला. ।।१९।। आणि मुनींना आणि देवांना म्हणाला, "भक्तिभावाने केलेली पूजा मग ती लहान असो किंवा मोठी, दूर्वांकुराशिवाय असेल तर ती व्यर्थ ठरते. ।।२०।। दूर्वांकुरांशिवाय केलेल्या पूजेचे फळ कुणालाही मिळत नाही. म्हणून माझ्या भक्तांनी सकाळी एक किंवा एकवीस दूर्वा वाहिल्या तर त्या फार मोठे फळ देतात. हे मुनिजन हो! शेकडो यज्ञ, दानधर्म, व्रतांची अनुष्ठानं, कठोर तपाचरण, कोट्यवधी जन्मात केलेले नियमपालन यानंही जे पुण्य मिळत नाही ते दूर्वा अर्पण केल्यामुळे मिळते.” ।।२१।।

/


Older Post Newer Post


Translation missing: mr.general.search.loading