-
६४. बुद्धी, सामर्थ्य आणि उत्साह यांच्या बळावर सर्व अस्त्र विद्येत निष्णात असणारा अर्जुन, अस्त्रांच्या प्रयोगात आणि गुरूवरील प्रेमाच्या बाबतीत सर्वांपेक्षा वेगळा होता.
६५. अस्त्रविद्या सर्वांना सारखीच शिकवली होती, पण कौशल्यामुळे पराक्रमी ठरलेला एकटा अर्जुनच सर्व राजकुमारांमध्ये अतिरथी ठरला.
६६. ताकदीमध्ये वरचढ असलेला भीमसेन आणि विद्यावान अर्जुन या दोघांचाही दुष्ट कौरव द्वेष करीत असत.
६७. सर्व विद्या आणि सर्व अस्त्रे शिक्षण दिलेल्या त्या सर्वांना श्रेष्ठ गुरू द्रोणाचार्य यांनी एका ठिकाणी गोळा केले. बाणाने वेध घेण्याचे त्यांचे कौशल्य द्रोणांना बघायचे होते.
६८. एका झाडाच्या शेंड्यावर कारागिरांनी केलेला एक कृत्रिम पक्षी त्या कुमारांच्या नकळत ठेवला आणि तोच बाणाचे लक्ष्य आहे असे सांगितले.
६९. तुम्ही सर्वांनी आपापली धनुष्ये घेऊन त्यांवर बाण सज्ज करून या कृत्रिम पक्ष्यासमोर सर्वांनी उभे रहा.
७०. मी सांगितल्याबरोबरच त्याचे मस्तक तुम्ही बाणाने उडवावे. मी एकेकाला सांगीन, बाळांनो! तसेच तुम्ही करा.
७१. नंतर अंगिरस कुळातले ते श्रेष्ठ ऋषी प्रथम युधिष्ठिराला म्हणाले, एक महावेगवान बाण धनुष्यावर चढव आणि माझे बोलणे संपल्यावर तो सोड.
७२. मग गुरूनं सांगितले त्यानुसार प्रथम आपले धनुष्य घेऊन तो शत्रूंना धडकी भरवणारा युधिष्ठिर, त्या कृत्रिम पक्षाच्या समोर उभा राहिला! हे भरतकुलश्रेष्ठा परीक्षिता!
७३. मग धनुष्य सज्ज करून बसलेल्या त्या कुरुकुळातील पुत्राला ते द्रोण लगेचच असे म्हणाले,
७४. "हे राजपुत्र! झाडाच्या शेंड्यावर बसलेला तो कृत्रिम पक्षी पहा." युधिष्ठिर म्हणाला "आचार्य दिसतोय मला."
७५. लगेचच द्रोण पुन्हा त्याला म्हणाले, "मग तुला हे झाड, मी, तुझे भाऊ, हे दिसत आहेत का?"
७६. तो कुंतीपुत्र त्यांना म्हणाला, "हे प्रचंड मोठं झाड मला दिसत आहे. तुम्ही दिसत आहात. तसेच भाऊ व पक्षी यांना मी परत परत पहात आहे.
७७. द्रोण मनातून नाराज झाले व त्याची अवहेलना करीत त्याला म्हणाले, “दूर हो! पक्ष्याचा वेध घेणं तुला जमणार नाही.”
७८. मग त्या थोर कीर्तिमान द्रोणांनी जाणण्याच्या इच्छेने त्याच प्रकारे दुर्योधन इ. धृतराष्ट्र पुत्रांना भीम वगैरे अन्य शिष्यांना, इतर देशातल्या राजांना विचारले. तसेच सर्व दिसत आहे, असे म्हटल्यावर त्यांची निंदा झाली.
येथे महाभारतातील आदीपर्वातल्या संभव पर्वातील द्रोण शिष्य परीक्षेचा एकशेएकतिसावा अध्याय संपला.
१. मग स्मितहास्य करीत द्रोण धनंजयाला म्हणाले, “पहा तुला आता या लक्षाचा वेध घ्यायचा आहे.
२. मी सांगितल्याबरोबर तुला बाण सोडायचा आहे. बाळ! धनुष्य सज्ज करून क्षणभर थांब.”
३. असे म्हटल्यावर गुरूंच्या या बोलण्याने प्रेरित झालेला सव्यसाची अर्जुन, धनुष्य वाकवून कृत्रिम पक्ष्याच्या समोर उभा राहिला.
४. त्या क्षणीच द्रोण त्याच प्रकारे त्याला म्हणाले, “हे झाड, त्यावरील तो कृत्रिम पक्षी, मी सुद्धा, तुला दिसतोय ना रे अर्जुन!
५. हे भरतकुलपुत्र परीक्षिता! अर्जुन द्रोणाचार्यांना म्हणाला, “मला फक्त तो पक्षी तेवढा दिसत आहे. वृक्ष, तुम्ही, काही मला दिसत नाही.”
६. तेव्हा आनंदीत झालेले दुर्दम्य द्रोण, महारथी पांडवास पुन्हा एकदा म्हणाले,
७. “जर हा पक्षी तुला दिसत असेल, तर मला परत एकदा सांग.” तो म्हणाला, “त्या पक्षाचे शरीर दिसत नाही, तर त्याचे केवळ मस्तक दिसत आहे.”
८. अर्जुनाने असे म्हटल्यावर द्रोण आनंदाने रोमांचित झाले आणि अर्जुनाला म्हणाले, “बाण सोड.” अर्जुनानेही अन्य कोणताही विचार न करता बाण सोडला.
९. मग धारदार बाणाने पंडूपुत्र अर्जुनाने झाडावर ठेवलेल्या पक्ष्याचे शिर तत्काळ खाली पाडले.
१०. ते काम पूर्ण झाल्यावर द्रोणांनी त्या पंडुपुत्रास आलिंगन दिले व त्यांना वाटलं की सगळ्या लवाजम्यासकट द्रुपदाचा आता युद्धात पराभव झालाच!!
-
बुद्धियोगबलोत्साहैः सर्वास्त्रेषु च निष्ठितः ।
अस्त्रे गुर्वनुरागे च विशिष्टोऽभवदर्जुनः ।। ६४ ।।
तुल्येष्वस्त्रोपदेशेषु सौष्ठवेन च वीर्यवान् ।
एकः सर्वकुमाराणां बभूवातिरथोऽर्जुनः ।। ६५ ।।
प्राणाधिकं भीमसेनं कृतविद्यं धनंजयम् ।
धार्तराष्ट्रा दुरात्मानो नामृष्यन्त परस्परम् ।। ६६ ।।
तांस्तु सर्वान् समानीय सर्वविद्यास्त्रशिक्षितान् ।
द्रोणः प्रहरणज्ञाने जिज्ञासुः पुरुषर्षभः ।। ६७ ।।
कृत्रिमं भासमारोप्य वृक्षाग्रे शिल्पिभिः कृतम् ।
अविज्ञातं कुमाराणां लक्ष्यभूतमुपादिशत् ।। ६८ ।।
शीघ्रं भवन्तः सर्वेऽपि धनूंष्यादाय सर्वशः ।
भासमेतं समुद्दिश्य तिष्ठध्वं संधितेषवः ।। ६९ ।।
मद्वाक्यसमकालं तु शिरोऽस्य विनिपात्यताम् ।
एकैकशो नियोक्ष्यामि तथा कुरुत पुत्रकाः ।। ७० ।।
ततो युधिष्ठिरं पूर्वमुवाचाङ्गिरसां वरः ।
संधत्स्व बाणं दुर्धर्ष मद्वाक्यान्ते विमुञ्च तम् ।। ७१ ।।
ततो युधिष्ठिरः पूर्वं धनुर्गुह्य परंतपः ।
तस्थौ भासं समुद्दिश्य गुरुवाक्यप्रचोदितः ।। ७२ ।।
ततो विततधन्वानं द्रोणस्तं कुरुनन्दनम् ।
स मुहूर्तादुवाचेदं वचनं भरतर्षभ ।। ७३ ।।
पश्यन त द्रुमाग्रस्थ भास नरवरात्मज ।
पश्यामीत्येवमाचार्य प्रत्युवाच युधिष्ठिरः ।। ७४ ।।
स मुहूर्तादिव पुनर्द्राणस्तं प्रत्यभाषत ।द्रोण उवाच
अथ वृक्षमिमं मां वा भ्रातृन् वापि प्रपश्यसि ।। ७५ ।।
तमुवाच स कौन्तेयः पश्याम्येनं वनस्पतिम् ।
भवन्तं च तथा भ्रातॄन् भासं चेति पुनः पुनः ।। ७६ ।।
तमुवाचापसर्पति द्रोणोऽप्रीतमना इव ।
नैतच्छक्यं त्वया वेद्धुं लक्ष्यमित्येव कुत्सयन् ।। ७७ ।।
ततो दुर्योधनादींस्तान् धार्तराष्ट्रान् महायशाः ।
तेनैव क्रमयोगेन जिज्ञासुः पर्यपृच्छत ।। ७८ ।।
अन्यांश्च शिष्यान् भीमादीन् राज्ञश्चैवान्यदेशजान् ।
तथा च सर्वे तत् सर्वं पश्याम इति कुत्सिताः ।। ७९ ।।
इति श्रीमहाभारते आदिपर्वणि सम्भवपर्वणि द्रोणशिष्यपरीक्षायामेकत्रिंशदधिकशततमोऽध्यायः ।। १३१ ।।
ततो धनंजयं द्रोणः स्मयमानोऽभ्यभाषत ।
त्वयेदानीं प्रहर्तव्यमेतल्लक्ष्यं विलोक्यताम् ।। १ ।।
मद्वाक्यसमकालं ते मोक्तव्योऽत्र भवेच्छरः ।
वितत्य कार्मुकं पुत्र तिष्ठ तावन्मुहूर्तकम् ।। २ ।।
एवमुक्तः सव्यसाची मण्डलीकृतकार्मुकः ।
तस्थौ भासं समुद्दिश्य गुरुवाक्यप्रचोदितः ।। ३ ।।
मुहूर्तादिव तं द्रोणस्तथैव समभाषत ।
पश्यस्येनं स्थितं भासं द्रुमं मामपि चार्जुन ।। ४ ।।
पश्याम्येकं भासमिति द्रोणं पार्थोऽभ्यभाषत ।
न तु वृक्षं भवन्तं वा पश्यामीति च भारत ।। ५ ।।
ततः प्रीतमना द्रोणो मुहूर्तादिव तं पुनः ।
प्रत्यभाषत दुर्धर्षः पाण्डवानां महारथम् ।। ६ ।।
भासं पश्यसि यद्येनं तथा ब्रूहि पुनर्वचः । शिरः पश्यामि भासस्य न गात्रमिति सोऽब्रवीत् ।। ७ ।।
अर्जुनेनैवमुक्तस्तु द्रोणो हृष्टतनूरुहः ।
मुञ्चस्वेत्यब्रवीत् पार्थं स मुमोचाविचारयन् ।। ८ ।।
ततस्तस्य नगस्थस्य क्षुरेण निशितेन च ।
शिर उत्कृत्य तरसा पातयामास पाण्डवः ।। ९ ।।
तस्मिन् कर्मणि संसिद्धे पर्यष्वजत पाण्डवम् ।
मेने च द्रुपदं संख्ये सानुबन्धं पराजितम् ।। १० ।।