बाप्पाला गणपती का म्हणतात?
आमच्या पुस्तकातल्या गोष्टी या शिशूंना लक्षात घेऊन संक्षिप्त स्वरूपात लिहिलेल्या आहेत. यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक, नकारात्मक गोष्टींचा उल्लेख टाळला आहे किंवा गोष्टीची गरज असल्यास नावापुरता केला आहे. पण पालकांना उत्सुकता नक्कीच असेल की ही मूळ गोष्ट कशी आहे व कुठल्या ग्रंथातली आहे, आणि म्हणूनच आपण या पानावर आला आहात. इथे आम्ही ही गोष्ट कोणत्या ग्रंथातली आहे, तिचे मूळ संस्कृत रूप आणि त्याचा अनुवाद दिलेला आहे. पालकांनी ती पूर्ण वाचावी, आपल्या बाळाची समज, त्याला काय सांगायचे आणि शिकवायचे याबद्दल आपले विचार लक्षात घेऊन घेऊन, गोष्ट वाचून दाखवताना त्यात तपशील घालावे. पुस्तकातली गोष्ट ही आधार असून, पालकांनी ती आपल्या भाषेत रंगवून आपल्या बाळाला सांगावी. या पद्धतीने हे पुस्तक खूप वर्ष तुमच्या शिशूंची सोबत करेल.
१. अगदी तान्ह्या बाळांना फक्त रंग कळतील, वस्तू धरायची सवय होईल.
२. बाळ पालथं पडल्यावर आकर्षक रंग असलेली ही पुस्तके समोर ठेवल्यास बाळ ती बघत बसेल, घ्यायचा प्रयत्न करेल.
३. या सर्व टप्प्यांवर तुम्ही जर बाळाला गोष्टी वाचून दाखवत राहिलात तर ते तुमच्या आणि बाळाच्या दिनक्रमाचा एक सुंदर भाग बनू शकेल.
४. हळू हळू मुलं चित्र आणि गोष्टी यांचा संबंध जोडू लागतील. आणि जसे जसे तुम्ही गोष्ट वाचाल, तशी तशी पानं उलटू लागतील.
५. आणि जेव्हा ही मुलं वाचायला लागतील, तेव्हा अत्यंत सोप्प्या भाषेतील या गोष्टी त्यांचे पहिले वाचन साहित्य होईल.
आता वळूया आपल्या मूळ संस्कृतमधील गोष्ट आणि तिच्या अनुवादाकडे.
(ही गोष्ट गणेश पुराणातील उत्तरखंडातील १०६व्या अध्यायात सांगितली आहे.)
अनुवाद
प्रजापती म्हणाला -
त्यानंतर तेराव्या वर्षी महेश्वरांना नमस्कार करून ते झोपले असताना त्यांच्या मस्तकावरील चंद्र मयुरेशने घेतला. भस्म लावलेले त्यांचे शरीर मोठे सुंदर दिसत होते. त्या पंचाननांच्या भुजा म्हणजे दिशाच होत्या. त्या शुभ व अच्युत अशा चंद्रशेखरानी मुंडक्यांची माळ घातली होती. (सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर, ईशान ही श्री शिवाची पाच मुखे होत.) ।।१।। ।।२।। एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या, नाचणाऱ्या अशा आपल्या छोट्या मित्रांच्या गोतावळ्याबरोबर खेळत तो बाहेर निघून गेला. ।।३।।
(त्या नंतरच्या ४ ते १२ व्या श्लोकाचा पूर्वार्ध यामधे मंगलासुराची गोष्ट असून आपल्या प्रस्तुत पुस्तकात घेतलेल्या गोष्टीशी तिचा थेट संबंध नसल्याने आम्ही तो येथून वगळला आहे. मात्र वाचकांच्या सोयीसाठी मुख्य गोष्ट झाल्यावर शेवटी तो उद्धृत केला आहे. त्याचे भाषांतरही तिथेच त्यानंतर दिले आहे)
प्रजापती म्हणाला –
त्यानंतर शिवाला जेव्हा आपल्या डोक्यावरचा चंद्र दिसला नाही ।।१२।। तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल झाले, जणू काही स्वर्गालाच जाळायला निघालाय! संतापून त्याने आपल्या गणांना म्हटले, "अरे कसं रक्षण करता रे तुम्ही? ।।१३।। कुणा राक्षसाने माझ्या डोक्यावरचा पांढराशुभ्र चंद्र पळवला?"
प्रजापती म्हणाला -
तेव्हा मान खाली घातलेले गण भीतीने कापू लागले. ।।१४।। धैर्य एकवटून काही जण शिवाला म्हणाले, "उमानाथ! आपला पुत्र, ज्याचे नाव मयूरेश आहे, तो बाहेर खेळायला गेलाय, त्याच्या हातात चंद्र दिसला पण कधी त्याने तो नेला, आम्हाला कळलंच नाही." ।।१५।। ।।१६।। असे त्यांचे बोलणे ऐकून रागावलेला शिव म्हणाला, "खाण्याच्या बाबतीत तुम्ही मोठे तत्पर आहात, असं कसं रक्षण करता रे तुम्ही? ।।१७।। चंद्र किंवा चंद्र पळविणारा तुम्ही आणून दिलात तर ठीक! नाहीतर सगळ्यांचे मी निश्चितच भस्म करून टाकीन!" ।।१८।। तेव्हा ते ही चिडले आणि घाईघाईने पळत पळत मयुरेशाकडे येऊन रागावून त्याला म्हणाले, ।।१९।। "दुष्टा, चोरा, भगवान शिवांकडे जा, नाहीतर तो चंद्र तरी दे!" गणांचे हे वाक्य ऐकून गणेश रागावला. ।।२०।। अरे गणांनो! माझी आई त्रैलोक्याची जननी आहे. तिचा मी प्रभावशाली पुत्र आहे. ते किंवा तुम्ही कोणीच माझ्या बरोबरीचे नाही. ।।२१।। त्याच्या फुंकरीने ते सगळे गण वादळात पाचोळा उडावा तसे उडाले आणि दीनवाणे होऊन शिवाच्या पुढ्यात येऊन पडले. ।।२२।। अतिशय रागावून महादेव, त्या प्रमथ इ. गणांना म्हणाले, " उमेच्या त्या दुष्ट, लहानशा मुलाला पकडून आणा!" ।।२३।। ते वेगाने धावले, जिथे तो बालक खेळण्यात मग्न होता! त्यांना दिसले, तो अनेक छोट्या मुलांबरोबर निर्भयपणे खेळतोय. ।।२४।। आपल्याला पकडण्यासाठी चहूबाजूंनी घेरून टाकणाऱ्या त्या गणांना विनायकाने गोंधळातच टाकले. तो लपला. चहू दिशांत ते गण त्याला शोधू लागले. ।।२५।। कोणत्याही घरात आणि जंगलातही त्यांना विनायक दिसला नाही. क्वचितच कुठेतरी त्या गणपतीला पाहून ते म्हणाले, "तुम्ही आमच्यापुढे कसे काय?" ।।२६।। ब्रह्मलोकी जाणे तुम्हाला शक्य आहे. पण तुम्ही स्थिर उभे राहिलात कि तुम्हाला भगवान शिवाकडे नेऊ." पण तो असा अंतर्धान पावून परत परत प्रकट होत होता. ।।२७।। तेव्हा खिन्न झालेले ते गण पाहून तो कृपाळू परमात्मा त्यांच्या समोर स्पष्टपणे प्रकट झाला. त्याला पाहून ते अतिशय आनंदित झाले. ।।२८।। गिरिजेच्या मुलाला त्यांनी पकडले आणि भगवान शंकरांकडे नेले. पण पृथ्वीसारखे वजन असलेल्या, बसलेल्या त्याला ते गण उठवू शकले नाहीत. ते आश्चर्यचकित झाले. त्यांचे प्रयत्न फुकट गेले. ते सर्व गण शिवाकडे येऊन त्याला म्हणाले, ।।२९।। ।।३०।। "हे भगवान शंकर! आम्ही सगळे मिळून सुद्धा त्या एकाला आणू शकलो नाही. मग भगवान शंकरांनी पुढ्यात बसलेल्या नंदीला आज्ञा केली, ।।३१।। "तू ताबडतोब जा आणि त्या चोर मयूरेशाला घेऊन ये." नंदी म्हणाला, "आपल्या आज्ञेने मी शेषाला, सूर्याला, चंद्राला सुद्धा मारेन. ।।३२।। हे सगळे माझ्यापुढे कनिष्ठ आहेत. भगवान महेश्वरा! माझ्या बरोबरीचा यात कुणीच नाही."
प्रजापती म्हणाला –
असं म्हणून वायुसारखा वेगवान, झाडे व पर्वत उलथून पाडणारा, संतापाने डोळे लालेलाल झालेला, धारदार शिंगे असणारा, स्वर्गालाच गिळंकृत करायला निघालेला नंदी मयूरेशाला म्हणाला, "चल रे शिवाकडे, ।।३३।। ।।३४।। नाहीतर मी नेईन तुला. मी काही इतर गणांसारखा नाही." असं तो म्हणताच मयूरेश संतापला. त्याने जोरात फुंकर मारली आणि खूप ये जा असल्यामुळे गजबजून गेलेल्या शिवा जवळच्या जागेत बिचाऱ्याला जोरात फुंकरीने टाकून दिलं. तो तोंडातून रक्त ओकत होता. तो जमिनीवर धपकन पडला. बढाया मारणारा तो, दोन मुहूर्त खूप प्रगाढ मूर्च्छेत होता. ।।३५।। ।।३६।। ।।३७।। आणि आपल्या मांडीवर मयूरेश बसलेला, त्या शिवाला दिसला. त्याचे शरीर अत्यंत लखलखीत होते व त्याने दिव्य आभूषणे घातली होती. ।।३८।। मस्तकी चंद्र असलेल्या शिवाला पाहून, गण म्हणाले, "देवा! श्री शिवा! जसा पूर्वी तुमच्या मस्तकावर चंद्र होता तसाच आत्ता आहे. उगीचच तुम्ही आम्हाला आज्ञा केलीत." ।।३९।।
शिव म्हणाले -
मस्तकावर चंद्र पाहून, मयूरेशाला व गणांना शिव म्हणाले, "ते सगळे गण, तू आणि नंदी माझ्या आज्ञेने सगळे तुम्ही थकून गेलात. चंद्र माझ्याच मस्तकी असताना तुम्ही उगीचच लढलात!" प्रमथ नावाचे गण म्हणाले, "हे देवांच्या देवा! आज पासून मयूरेश्वरच आमचा स्वामी असावा." ।।४०।। ।।४१।।
प्रजापती म्हणाला –
"तसेच होवो, तो गणराज होवो" असे शिव म्हणाला. मग शिवाला, गणेशाला, त्याच्या मातेला नमस्कार करून देवांचाही स्वामी अशा मयूरेशाची प्रशंसा करीत, तसेच जयजयकार करीत, गण आनंदाने आपल्या घरी गेले. ।।४२।।
*४ ते १२ पूर्वार्ध या ग्रंथभागाचा अनुवाद.
तेवढ्यात तिथे मंगल नावाचा दैत्य आला. महाभयंकर तोंड असलेला, जिंकणारा, वेगाने पाळणारा, वराहाचे रूप असलेला, अत्यंत बलवान, सुळ्यांनी झाडे उलथून पाडणारा, अशा त्याने आपल्या वज्राची ताकद असलेल्या केसांनी आकाश आणि पावलांनी पृथ्वीच फोडून काढली. ।।४।। ।।५।। काजळाच्या पर्वतासारखा तो काळा होता. अग्निकुंडासारखे त्याचे डोळे होते. पावसाळ्यातल्या ढगासारखा त्याचा आवाज होता. त्याला बघून सगळी मुले पळायला लागली. ।।६।। “हा असला वराह यापूर्वी कधी पहिला नव्हता" असं ती मुलं म्हणू लागली. तो मुलांना मारणार एवढ्यात मयूरेशाने त्या वराहरूपी दुष्ट दैत्याचे दोन्ही सुळे पकडले आणि दुसऱ्या हाताने त्याचा खालचा ओठ पकडला. ।।७।। ।।८।। मग एखादा बांबूचा तुकडा चिरफाळावा, तसं त्या लहान मुलानं त्याला फाडून टाकलं. दहा योजनं लांब अशा आपल्या पूर्व देहाने झाडांचा भुगा करीत आणि पृथ्वी फाडत फाडत तो दैत्य खाली पडला. तेव्हा ती मुले त्याला – मयूरेशाला म्हणाली, "हा पार्वतीचा मुलगा धन्य आहे. ।।९।। ।।१०।। हा महाबलवान आहे. क्षणभरात त्याने अगदी सहज दैत्य मारला. या दैत्याच्या दर्शनाने घाबरून आम्ही दहा दिशांना पळालो होतो. ।।११।। पडता पडता याने घरांचा चुराडा केला. ।।१२।।
/